परेश सोनावणे यांचा स्तुत्य उपक्रम
जिल्हा परिषद ठाणे, शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ‘मिशन भरारी – शिष्यवृत्ती सराव चाचणी २०२६-२७’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाला अधिक बळ देत ग्रुप ग्रामपंचायत डोहोळे येथील ग्रामपंचायत अधिकारी परेश कांचन सोनावणे यांनी आपल्या आजी, लाडक्या ‘बय’ स्व. हिराबाई दुदाजी सोनावणे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक संचांचे वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
‘मिशन भरारी’ या उपक्रमांतर्गत कोशिंबी केंद्रातील जवळपास १० शाळा आणि पडघा केंद्रातील ०२ शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मदत व्हावी, या उद्देशाने पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली ते चौथीच्या पायाभूत अभ्यासासाठी, तसेच इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळून जवळपास ३५ हजार रुपये मूल्याचे पुस्तक संच मोफत वितरित करण्यात आले.
परेश सोनावणे यांनी सामाजिक दातृत्वाची भावना जपत यापूर्वीही अनेक शैक्षणिक उपक्रमांना हातभार लावला आहे. आपल्या आजींच्या स्मरणार्थ त्यांनी डोहोळेपाडा जिल्हा परिषद शाळेतील ग्रंथालयासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम तसेच इतर शैक्षणिक साहित्याची मदत केली होती. कांदली कातकरीवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी दोन टेबल उपलब्ध करून दिले. तसेच, स्वतःच्या पुढाकाराने आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लोकवर्गणी गोळा करून कळंबोली जिल्हा परिषद शाळेला दूरचित्रवाणी संच उपलब्ध करून दिला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (भा.प्र.से.) आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मिशन भरारी’ अभियानात परेश सोनावणे यांनी दिलेले हे वैयक्तिक योगदान प्रेरणादायी ठरत आहे.



