किरण नाकती यांच्या पुढाकाराने उपक्रम
आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या माध्यमातून संस्थापक किरण विष्णू नाकती यांच्या पुढाकाराने नौपाडा विभागातील प्रभाग क्र. २१ मधील सुमारे ५५० ज्येष्ठ नागरिकांना ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या मोफत बस प्रवासासाठी स्मार्ट कार्डचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य प्रतिष्ठान ठाणे व ‘वुई आर फॉर यू’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेचा लाभजेष्ठ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
नोंदणी अर्ज भरण्यापासून ते शुल्क भरणे आणि ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या हाती सुपूर्द करणे, ही संपूर्ण प्रक्रिया किरण नाकती यांच्या टीमने पूर्ण केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण न येता या योजनेचा लाभ मिळाला.
या कार्यक्रमाला ठाणे महापालिका परिवहन सेवेचे माजी सभापती व शिवसेना सचिव विलास जोशी, संस्थेचे अध्यक्ष सचिन देशपांडे, कार्यकारिणी सदस्य रमाकांत चौधरी, माधव भिडे, मनोज पिंगळे तसेच विविध विभागांतील मान्यवर उपस्थित होते.
किरण नाकती यांच्या माध्यमातून प्रभागात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, ज्येष्ठ नागरिकांसाठीही विविध योजना व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
यावेळी लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच किरण नाकती यांचे आभार मानले. “संकटाच्या वेळी हक्काचा माणूस म्हणून किरण नाकती नेहमीच धावून येतात,” असे मत ज्येष्ठ नागरिक संघाचे रघुनाथ सामंत यांनी व्यक्त केले.



