आसनगावात जलजीवन मिशन पाणी योजनेला गतीग्रामस्थ, अधिकारी व ठेकेदारांची आढावा बैठक संपन्न

प्रशांत गडगे शहापूर – 

शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (माजिप्रा) कार्यालयात ग्रामस्थ, उपअभियंता आणि ठेकेदार यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत कामातील अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहापूर तालुक्यातील नामांकित ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून आसनगाव ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येमुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. अखेर शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ४० कोटी रुपयांची स्वतंत्र पाणी योजना मंजूर केली.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन उपक्रमांतर्गत प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेनुसार प्रतिव्यक्ती दररोज किमान ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शहापूर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण १७९ योजनांची कामे सुरू असून, त्यातील अनेक कामे संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. आसनगाव पाणी योजनेसाठी ९ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय घेण्यात आला असून, ३० जानेवारी २०२३ रोजी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. करारानुसार १८ महिन्यांत काम पूर्ण करून पुढील १२ महिने योजना चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, तांत्रिक अडचणी, भूसंपादनातील विलंब तसेच शासकीय बिलांच्या प्रक्रियेमुळे कामात काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत जॅकवेलवरील वीजपुरवठ्याचे काम येत्या महिनाभरात पूर्ण करून पंपिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासन व ठेकेदारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
चौकट 
सध्या कामाला पुन्हा गती मिळाली असून, पुढील ३० दिवसांत बोरशेती जॅकवेलवरील वीजजोडणी पूर्ण करून पंपिंग प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. 

केतन चौधरीउपअभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग शहापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top