नवी मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
मंडळाच्या विहीत कार्यपध्दतीनुसार दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवार दि. 8 मे 2026 रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका संचालित 23 माध्यमिक शाळांमधून 2492 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महानगरपालिकेच्या २३ शाळांपैकी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 120 दिवा (काचेची शाळा) या शाळेचा 100% निकाल लागलेला आहे. नमुंमपा शाळेतील 2703 विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये सहभागी झाले होते, त्यापैकी 2492 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल 92.19 % एवढा लागलेला आहे.
यामध्ये नमुंमपा शाळा क्र. 116 सानपाडा (मराठी माध्यम ) मधील विद्यार्थी कु. अभिराम मनोजकुमार राऊत 94.40 टक्के गुण संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेला आहे. त्याचप्रमाणे नमुंमपा शाळा क्र. 120, दिवा ऐरोली (इंग्रजी माध्यम) मधील विद्यार्थिनी कु. रिया राकेश कहार ही 93.40 % गुण संपादन करून नमुंमपा शाळांमधून व्दितीय तसेच कु.श्रावणी संदीप गालवे ही नमुंमपा शाळा क्र. 118 पावणे (मराठी माध्यम) शाळेतील विद्यार्थिनी 93.20 % गुण संपादन करून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 माध्यमिक शाळांतून गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने यशवंत झालेल्या या विद्यार्थ्यांप्रमाणेच दहावीच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, सभापती स्थायी समिती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक, विरोधी पक्षनेते श्री.विजय चौगुले यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सर्व महानगरपालिका शाळेला २१ मार्गदर्शक अपेक्षित संच पुरविण्यात आले होते. दिवाळीच्या सुट्टीत तसेच शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व शाळांला सराव प्रश्नसंच उपलब्ध करुन देण्यात आले होते. या प्रश्नसंचाचा उपयोग करुन शालेय स्तरावर नियमितपणे सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले. शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश प्राप्त झाले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली, शिक्षाधिकारी श्री.अशोक कडुस, सर्व केंद्र समन्वयक यांनी सातत्यपूर्ण आढावा घेत महानगरपालिकेचे शिक्षण व्हिजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणजे महानगरपालिका शाळांचा हा उत्तम निकाल असून सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.


