लग्नाचे मुहूर्त ‘ब्राह्मणांना’ विचारून काढावेत की हवामान खात्याला?

हळदीत पाणी, लग्नात विजांसह कडकडाटाचे विघ्न; लाखो रुपयांचे मंडप पावसात भिजल्याने मंडप व्यावसायिकांवर अस्मानी संकट

प्रशांत गडगे शहापूर – 

दोन कुटुंबांचे कायमस्वरूपी सोयरसंबंध जुळवणारा विवाह हा भारतीय संस्कृतीतील मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. मुलगा आणि मुलगी वयात आल्यानंतर त्यांचे पुढील आयुष्य सुखकर जावे, या हेतूने दोन अनोळखी जीवांना विवाहबंधनात अडकवून पालक आपली जबाबदारी पार पाडतात आणि नव्या संसाराची सुरुवात होते. त्यामुळे आपल्या मुला-मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्चही केला जातो.


शहरांसह ग्रामीण भागातही बहुतेक लग्ने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित केली जातात. मे महिन्यात शाळांना सुट्ट्या असतात, तसेच बहुतेकांना वेळ उपलब्ध असल्याने या काळातील मुहूर्तांना अधिक पसंती दिली जाते. मात्र यावर्षी मे महिन्याच्या ६ तारखेपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने निसर्गराजा कोपला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.संपूर्ण शहापूर आणि मुरबाड तालुक्यात ६ मेपासून वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नियोजित विवाह सोहळ्यांमधील वधू-वरांसह वऱ्हाडी मंडळींच्या आनंदावर विरजण पडले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात आजही तीन दिवस चालणारे लग्नसमारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उटणी, हळद आणि लग्नसोहळा असे विविध विधी पार पडतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून मंडप, डेकोरेशन, डीजे आणि जेवणावळींचे नियोजन केले जाते.


परंतु यावर्षी लग्नसराईतच पावसाने हजेरी लावल्याने `हळदीत पाणी’ तर `लग्नाचा बोजवारा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि लखलखाट सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच महावितरणची वीजपुरवठा यंत्रणाही वारंवार खंडित होत असल्याने अनेक ठिकाणी हळदीचे कार्यक्रम नाईलाजाने रद्द करावे लागत आहेत. त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमासाठी उत्सुक असलेल्या तरुणाईचाही मोठा हिरमोड झाला आहे.


ग्रामीण भागात अद्यापही बहुतांश ठिकाणी लग्नासाठी सुसज्ज सभागृहे उपलब्ध नसल्याने बांबूच्या आधारावर कापडी मंडप उभारले जातात. मात्र सततच्या अवकाळी पावसामुळे हे महागडे मंडप भिजून जात आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक मंडप फाटल्याने मंडप व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
सध्याची एकूण परिस्थिती पाहता, `लग्नाचा मुहूर्त भटजींना विचारून काढावा की हवामान खात्याला?’ असा उपरोधिक सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top