ठाण्यातील तलावांची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमेवत केली पाहणी

राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या पार्श्वभूमीवर तलावांची पाहणी

 ठाणे – तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर  बुधवारी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत तलावांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तलाव परिसरात आवश्यक असलेली कामे करण्यासंदर्भात महापौरांनी प्रशासनास सूचना दिल्या.

            सदर दौऱ्याची सुरूवात कचराळी तलाव येथून करण्यात आली. त्यानंतर  सिध्देश्वर तलाव, मखमली तलाव, ब्रह्माळा तलाव, घोसाळे तलाव, मदार्डे तलाव, गोकुळनगर तलाव आदींची पाहणी करण्यात आली. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्यासह त्या त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, माधुरी मेटांगे, काजल गुणीजन, नंदा पाटील, दिपक जाधव, शुचिता पाटणकर, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उपनगरअभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, स्वच्छता‍ निरीक्षक आदी उपस्थित होते.

          या दौऱ्याची सुरूवात कचराळी तलाव येथून करण्यात आली. कचराळी तलाव येथे असलेला विद्युत डी.पी ट्रान्सफर करणे, तसेच ज्या इंटरेनटच्या केबल्स तलावातून गेल्या आहेत, त्या काढून टाकण्यात याव्यात. तसेच तलाव परिसरात असलेले शौचालय नियमित स्वच्छ राहिल व मुबलक पाणी असेल हे पाहण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिल्या.

          सिध्देश्वर तलाव परिसरातील उद्यानाच्या दुरावस्थेबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत उद्यानात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात. या ठिकाणची ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी असलेली शेडची दुरूस्ती करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. या तलावाच्या आजबाजूला असलेल्या चाळीतील सांडपाण्यासाठी गटाराची सोय करण्यात यावी तसेच तलावांच्या बाजूला असलेला कचरा नियमित उचलण्यात यावा असे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केले

            मखमली तलावातील गाळ काढणे, भिंतीचे काम करणे व तलावात कारंजे बसविणे, तसेच ब्रह्माळा तलाव परिसरात सद्यस्थ‍ितीत एक शौचालय असून अजून एक शौचालय उभारणे, तसेच तलाव परिसरात सुरक्षारक्षक नेमण्यात यावे. घोसाळे तलाव परिसर सुस्थ‍ितीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध कराव्यात. मदार्डे तलाव परिसरात विद्युत दिव्यांची सोय करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे गोकुळनगर तलाव परिसराच्या आजूबाजूचे डेब्रीज उचलणे व तलावातील गाळ काढणे आवश्यक असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केले असून याबाबत तातडीने कामे करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या

                     महापालिकेकडून सध्या ‘अमृत 2.0’ योजनेंतर्गत शहरातील 15 तलावांच्या संवर्धनाची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. याशिवाय राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत आणखी सहा तलावांच्या विकासाची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.

           यावेळी तलाव परिसरात नियमित फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याशी संवाद साधला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top