शहापूरः तालुक्यातील डोळखांब
वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. दरम्यान लाद्याची वाडी येथील आठ वर्षीय कृष्णा आगीवाले या निष्पाप मुलाचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात रविवारी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सदर बिबट्याने डोळखांब परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार दर्शन देत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती. लहान मुले, महिला आणि शेतकरी वर्गामध्ये मोठी दहशत पसरली होती. काही दिवसांपूर्वी लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करण्यासाठी गेलेल्या कृष्णा आगीवाले या आठ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केले होते. या दुर्दैवी – घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती.
घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना आणि श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. नागरिकांच्या आणि श्रमजीवी संघटनेच्या वाढत्या दबावानंतर वनविभागाने विशेष पथके तयार करून परिसरात पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि रात्री गस्त वाढवली होती. अखेर सलग अनेक दिवसांच्या शोधमोहीमेनंतर संबंधित नरभक्षक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
वनविभागाकडून पकडण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पुढील निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच परिसरामध्ये अधिक बिबट्यांचे वावर असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे आणि वन क्षेत्रालगत सतर्क राहण्याचे आवाहन डोलखांब वनविभागाकडून करण्यात आले आहे.


