काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षपदी राहुल पिंगळे

ठाणे : काँग्रेस श्रेष्ठींनी ठाण्यातील
निष्ठावंत आणि तरुण कार्यकर्ते राहुल पिंगळे यांच्या खांद्यावर ठाणे अध्यक्षपदाची धुरा दिली आहे. या नियुक्तीमुळे शहरातील पक्ष संघटनेला आणि कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

दिवंगत शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या मुशीत तयार झालेले राहुल पिंगळे यांनी गेली अनेक वर्षे पाचहून अधिक शहर अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडत प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. स्व. सचिन शिंदे यांच्यासोबत त्यांनी अनेक आंदोलने, पक्षाचे उपक्रम, विविध चळवळीत सहभागी होऊन संघटनावाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. प्रशासनाच्या त्रुटींवर बोट ठेवून ठाणेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी पिंगळे हे नेहमीच आक्रमक भूमिका घेत आले आहेत.

त्यांच्या नियुक्तीमुळे ठाणे शहरात पक्ष संघटनेची वाढ होऊन कार्यकर्त्यांना बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. याबाबत बोलताना श्री. पिंगळे यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले. माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करीनच, शिवाय शहरातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून ठाणेकरांच्या हितासाठी झटेन. कार्यकर्त्यांना बळ मिळेल, संघटनेला बळ मिळेल, यासाठी पक्षाने दिलेले कार्यक्रम आम्ही एकजुटीने शहरात राबवू, असा विश्वास श्री. पिंगळे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top