महापालिका सर्वसाधारण सभेत पावसाळापूर्व कामांविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आयुक्त महोदयांनी नाले व गटार सफाईची पहाणी केली होती. त्यामध्ये 60 ते 80 टक्के कामे पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता व 15 मे पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यास अनुसरुन नालेसफाई व होल्डिंग पाँडची पाहणी केली असून प्रशासनाने समाधानकारक काम केले असल्याचे निदर्शनास येत असून या पावसाळयात नागरिकांना त्रास होणार नाही असा विश्वास वाटतो असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी, पावसाळापूर्व केलेली कामे तेव्हाच यशस्वी मानता येतील जेव्हा पावसाळयात नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही असे मत व्यक्त केले. मार्गील वर्षी 15 मे पासून पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र पाऊस काहीसा उशिरा येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या अनुषंगाने ही सुरु असलेली कामे अशीच गतीमानतेने सुरु ठेवावीत असे आदेशित करत भर पावसात पुन्हा पाहणी दौरा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सुरुवात करत नैसर्गिक नालेसफाई कामांची तसेच विशेषत्वाने होल्डिंग पाँड स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ तसेच आपापल्या विभागांमध्ये तेथील स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त संजय शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे व इतर अधिकारी या दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते. दिघा येथील ग्रीन वर्ल्ड जवळील नाल्यामधून एमसीडीसीएलच्या मोठ्या वायर्स जात असल्याने नाल्यात नागरिकांमार्फत टाकला जाणार कचरा अडकून राहतो. ही परिस्थिती अनेक ठिकाणी निदर्शनास येते, त्यामुळे या वायर्स एकत्रितपणे वरच्या बाजूला बांधून ठेवाव्यात जेणेकरुन प्रवाहातील वाहते पाणी अडणार नाही व रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महापौर महोदयांनी दिले. या स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनीही प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या अथवा कचरा न टाकण्याची दक्षता घ्यावी जेणेकरुन ते पुन्हा अस्वच्छ होणार नाही असे आवाहनही महापौरांनी केले.
काही ठिकाणी उद्योगसमुहांच्या बाजूने वाहत असलेल्या नाल्यांमध्ये कंपनीच्या बाजूने कचरा टाकला जातो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी उद्योग समूहांसोबत समन्वय साधण्याचेही महापौरांनी निदर्शित केले.
दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर अशा विविध क्षेत्रांमधील नाले सफाईची पाहणी करण्यासोबतच होल्डिंग पाँड क्षेत्रांचीही महापौरांनी पाहणी केली. दिघ्यापासून सुरु झालेल्या या पाहणी दौऱ्यात चांदणी चौगुले, गौरी आंग्रे, सायली शिंदे, दिव्या गायकवाड, प्रणाली लाड, सोनवी लाड, डॉ. प्रणाली पाटील, भाऊ भापकर, सुनिल कुरकुटे, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, कविता पाटील, सलुजा सुतार, अमित मेढकर आदी पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका आपापल्या क्षेत्रामध्ये उपस्थित होते.


