जनगणना २०२७ च्या अनुषंगाने मंगळवार, दिनांक २२ मे २०२६ रोजी मिरा भाईंदर महापालिकेमध्ये प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीदरम्यान जनगणना २०२७ च्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये क्षेत्रनिहाय नियोजन, प्रगणकांची नियुक्त्ती, प्रशिक्षण प्रक्रिया, माहिती संकलन पद्धती, नागरिकांशी समन्वय तसेच सर्वेक्षण कार्य प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जनगणना प्रक्रिया ही देशाच्या विकासनियोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
तसेच, निर्गमित केलेल्या आदेशान्वये जे पर्यवेक्षक व प्रगणक अद्याप जनगणना २०२७प्रक्रियाकरिता रुजू झाले नाही किंवा सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी टाळाटाळ करत नाही अशा पर्यवेक्षक व प्रगणकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्त यांनी चार्ज ऑफिसर यांना आजच्या बैठकीत दिले. जनगणना २०२७ अंतर्गत दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नियुक्त प्रगणक व अधिकारी घरोघरी भेट देऊन नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत. सर्व नागरिकांनी प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
तसेच, जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी अधिकृत ओळखपत्र असलेल्या प्रगणकांनाच माहिती द्यावी आणि जनगणना कार्य यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी सकारात्मक सहभाग नोंदवावा, असेही महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जनगणना २०२७ मधून प्राप्त होणारी माहिती ही भविष्यातील शहरी नियोजन, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


