रायगडावर ६ जूनच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी रायगड किल्ला येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासन आणि विविध शिवप्रेमी संस्थांकडून जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती शिवप्रेमी भूषण शिसोदे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ल्यावर स्वच्छता मोहीम, सजावट, रोषणाई तसेच भाविक आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. गडावरील प्रमुख मार्गाची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त आणि वैद्यकीय सुविधा यांवर विशेष भर देण्यात आला आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त रायगडावर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, पारंपरिक मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, शिवगर्जना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर दणाणून जाणार आहे. प्रशासनाने गर्दी लक्षात घेता वाहतूक आणि सुरक्षेचे नियोजन केले असून पर्यटकांनी शिस्त व स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top