महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये महाराष्ट्राने आपली ठळक छाप उमटवत राष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले आहे. ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘जलसमृद्ध पंचायत’ या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.


केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ चा दिमाखदार वितरण सोहळा आज नवी दिल्ली येथे पार पडला. केंद्रीय पंचायती राज मंत्री श्री. राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल तसेच आसाम सरकारचे मंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते विविध श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.


दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि – महिला सक्षमीकरण या नऊ प्रमुख विषयांवर आधारित कार्याचे मूल्यमापन करून पंचायतींना गौरविण्यात आले. पंचायत – प्रगती निर्देशांक च्या आधारे देशभरातील एकूण ४२ उत्कृष्ट पंचायतींची निवड करण्यात आली. यापूर्वी, २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन विशेष श्रेणींतील पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. आजच्या समारंभात उर्वरित श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ अंतर्गत ३४ ग्रामपंचायतींना, तर ‘नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ अंतर्गत ८ पंचायतींना गौरविण्यात आले.


भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.


तसेच, रायगड जिल्ह्यातील खारीवली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतीला हा सन्मान मिळाला.


नाशिक जिल्ह्यातील निंबळे (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच, रायगड जिल्ह्यातील चांभारली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळवत ३७.५ लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला.

Scroll to Top