जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने बिर्ला महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग, एनसीसी कॅडेट्स तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार पडला. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्रा, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, उद्यान अधीक्षक संजय जाधव, नगरसेविका अनघा देवळेकर, डॉ.तनुजा वायले, प्रमिला पाटील, नगरसेवक किरण भांगले, केडीएमसीचे बँड अॅम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, बिर्ला महाविद्यालयाचे वरिष्ठ उपप्राचार्य हरीश दुबे, मनिंदर कौर यांच्यासह प्राध्यापक, एनसीसी कॅडेट्स तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि शहराचा हरित विकास या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करणारा आणि हरित भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यावर्षी सुमारे १.५० लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून नागरिक, शैक्षणिक संस्था आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरणपूरक आणि हरित शहर उभारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.


