‘स्मार्ट’ नियोजनाच्या नावाखाली ठाण्याच्या वैभवाचा दिवसाढवळ्या संहार !
पर्यावरण दिनी हजारो रोपे लावल्याचा गाजावाजा होत असताना, -हाण्यातील प्रौढ वृक्ष मात्र विकासाच्या नावाखाली एकामागून एक जमीनदोस्त होत आहेत. वृक्षारोपणाच्या आकड्यांपेक्षा हरवलेल्या हिरवाईचा हिशोब महत्त्वाचा असताना, शहरातील वाढते काँक्रीटीकरण आणि घटती हरित क्षेत्रे प्रशासनाच्या पर्यावरणीय धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.
गेल्या दोन दशकांत शहराची लोकसंख्या आणि बांधकामांचा वेग प्रचंड वाढला. त्याचबरोबर रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, गृहनिर्माण संकुले आणि व्यावसायिक इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. अनेक ठिकाणी पर्यावरणीय भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यात आले असले, तरी लावलेल्या रोपांचे प्रत्यक्ष संवर्धन आणि जगण्याचे प्रमाण किती आहे, याचा सखोल आढावा क्वचितच घेतला जातो.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहरातील प्रौढ आणि दशकांपासून उभे असलेले वृक्ष हे केवळ ऑक्सिजन देणारे घटक नसून ते उष्णता नियंत्रित करणे, कार्बन शोषून घेणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा एका मोठ्या वृक्षाची जागा अनेक लहान रोपे लगेच घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वृक्षारोपणाइतकेच विद्यमान वृक्षांचे संरक्षणही आवश्यक आहे. ठाण्यातील वाढत्या काँक्रीटीकरणामुळे उष्णतेचे प्रमाण वाढल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत स्पष्टपणे दिसून आले आहे.
उन्हाळ्यात तापमानातील वाढ, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या आणि भूजल पातळीतील घट यांचा संबंध नैसर्गिक हरित क्षेत्रांच्या घटाशी जोडला जात आहे. अनेक भागांत. मोकळ्या जमिनी, नैसर्गिक नाले आणि झाडांनी व्यापलेले परिसर आता इमारतींनी गच्च भरले आहेत.
याउलट ठाणेकर नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढताना दिसत आहे. तलाव संवर्धन, खारफुटी संरक्षण, वृक्ष बचाव मोहिमा आणि जैवविविधतेच्या जतनासाठी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी सातत्याने आवाज उठवत आहेत. शहराच्या विकासाबरोबर पर्यावरणीय समतोल राखण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.


