कोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रारंभ किती आत्मियतेने केला यावर त्याचे यश अवलंबून असते, त्यामुळे स्वतः:पासूनच सुरुवात करायला नवी असे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना सांगत कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण आणि प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर याला सर्वांनी प्राधान्य दयावे व ‘प्लास्टिक मार्शल’ म्हणून काम करावे असे मत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी हा ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचे सांगत आयुक्त महोदयांनी शहर स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन काम करावे असे सूचित केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात राबविण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त सुसंवाद साधत होते. पर्यावरण दिनानिमित्त मुख्यालय इमारतीत तळमजल्यावर दर्शनी भागात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन बसविण्यात आलेली आहे. या मशीनचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, शिक्षण विभाग उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, क्रीडा विभाग उपआयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, मुख्य विधी अधिकारी श्री. अभय जाधव तसेच बायोक्रक्स संस्थेचे संचालक श्री. अजय मिश्रा व व्यवस्थापक व श्री. रौनक ठाकूर, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. प्रशांत पॅट्रो आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अटोस च्या सीएसआर निधीतून रोटरी क्लब व बायोक्रक्स या संस्थांच्या सहयोगाने ही प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करुन देण्यात आली असून या मशीनमध्ये प्लास्टिक बॉटल टाकून त्यावरील की-पॅड वर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन करीत दोन पॉईंटस मिळणार आहेत. हे पॉईंट्स संकलित करुन ठराविक पॉईंटस संकलित झाल्यानंतर स्मार्ट बझारव्दारे उपयोगी वस्तू मोफत मिळणार आहेत. अशा 12 मशीन्स महापालिका रूग्णालये, मार्केटसारख्या वर्दळीच्या जागा येथे बसविण्यात येणार आहेत.


