अंबरनाथ नगरपालिकेच्या धडक कारवाईत अनेक वर्षांचा ‘सोमवार बाजार’ उठला 

अंबरनाथ – अंबरनाथ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातून आठवडा खरेदीने प्रसिद्ध असलेल्या अंबरनाथ रेल्वे स्थानक पश्चिमेकडील टिळक मार्गावरील गेल्या अनेक वर्षांपासून भरणारा आठवडा ‘सोमवार बाजार’ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार कारवाई करून अखेर बंद पाडला आहे. यापुढे हा बाजार या ठिकाणी भरणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरापासून नगरपालिका प्रशासनाने सध्या शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात फेरीवाले हटाव मोहीम तीव्र केली आहे. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात हप्त्याच्या दहशतीखाली अनधिकृत फेरीवालाना ‘आंदण’ आशीर्वाद देणाऱ्यांची पाचावर धारण बसली असून अखेर फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाल्याने चौक मोकळे झाल्याची चर्चा अंबरनाथकरांमध्ये होऊ  लागली आहे.

या मोहिमेअंतर्गत दररोज बेकायदेशीर फेरीवाले आणि हातगाडी चालकांवर कारवाई करत त्यांच्या गाड्या व इतर साहित्य जप्त केले जात आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्यपूर्ण कारवाईमुळे अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अनेकदा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांचा फायदा घेऊन फेरीवाले बिनधास्तपणे रस्ते अडवून व्यवसाय करत असत. मात्र, आता या सुट्टीच्या दिवसांतही फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आठवडी बाजार लावण्यासाठी फेरीवाल्यांनी रस्यावर आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली होती. मात्र, तिथे आधीच तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला. काही दिवसांपूर्वीच उपजिल्हा शासकीय छाया रुग्णालयाला लागून असलेल्या रस्त्यावर अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना हटवण्यात आले होते. त्या वेळी लेबर फ्रंट युनियनचे पदाधिकारी ओगले यांनीही स्टेशन रोडवरील सोमवार बाजार बंद करण्याची मागणी केली होती. कारण हे आठवडी बाजारवाले देखील बेकायदेशीर फेरीवालेच आहेत, असे त्यांचे म्हणणे होते.

मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानंतर या सोमवार बाजारातील फेरीवाल्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आली असून, अंबरनाथमध्ये आता हा हप्तावारी बाजार भरणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. या सोमवार बाजाराला पर्याय म्हणून तो स्कायवॉकच्या वर सुरू करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

या सोमवार बाजाराच्या विरोधात स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. फेरीवाल्यांमुळे स्टेशन परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती, तसेच पादचाऱ्यांना चालणेही अशक्य झाले होते. आता सोमवारच्या दिवशी हा हप्तावारी बाजार या ठिकाणी अजिबात भरू दिला जाणार नाही, असे अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी स्पष्ट केले आहे.




Scroll to Top