वाशिंद येथे श्रमजीवी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता मेळावा संपन्न 

शहापूर – शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्रमजीवी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता मेळावा पार पडला.

आगामी काळात संघटन मजबूत करणे आणि लोकहिताचे निर्णय तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहापूर तालुका उपाध्यक्ष रुपेश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात श्रमजीवी संघटनेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी उपस्थितांचे स्वागत करून अध्यक्ष सीता घाटाळ यांचा सविस्तर परिचय करून दिला. याप्रसंगी शहापूर तालुका अध्यक्ष मालू हुमणे यांनी संघटनेच्या कार्याची दिशा, मुख्य उद्दिष्टे आणि आगामी वाटचालीची रूपरेषा कार्यकर्त्यांसमोर मांडली.

मार्गदर्शन करताना अध्यक्षा सीता घाटाळ यांनी शहापूर तालुक्यातील युवक आणि महिला नेतृत्वाच्या उभारणीचे कौतुक केले. तळागाळात सक्षम नेतृत्व घडत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांनी संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. प्रत्येक गरिबाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या मेळाव्यात मुलांचे शिक्षण, आधारकार्ड नोंदणी आणि वनहक्क दावे यांसारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २ जुलै रोजी प्रत्येक कार्यकर्त्याने पोस्टाद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या शिक्षण हक्क संघटनात्मक लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या मेळाव्याला जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी, ईश्वर बनसोडे, राजेंद्र म्हसकर, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे, खातीवली गट अध्यक्ष कमलाकर तारमळे, वाशिंद गट अध्यक्ष बाळाराम हरड, अघई गट अध्यक्ष चंद्रकांत मोरे, ज्येष्ठ कार्यकर्त्या गिरजाबाई म्हसकर आणि लडकीबाई बेलकडे यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संघटन मजबुतीचा निर्धार आणि सामाजिक प्रश्नांवर कायदेशीर मार्गाने लढा देण्याच्या आवाहनाने या मेळाव्याची सांगता झाली.




Scroll to Top