खालापूर – पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडे अर्ज-विनंत्या करणाऱ्या उंबरे सतीमाळ कातकरी वाडी येथील आदिवासी बांधवांना अखेर आंदोलनानंतर न्याय मिळाला आहे. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या तीव्र ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने बेकायदेशीर बोरवेल सील केली असून, दोषीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
उंबरे सतीमाळ कातकरी वाडी येथील बिगर आदिवासी कृष्णकांत दळवी याने दोन वर्षांपूर्वी गावकऱ्यांच्या विहिरीलगत ६०० फूट खोल बोरवेल मारली होती. यामुळे विहिरीचे पाणी आटले आणि वाडीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. याप्रकरणी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते मारुती वाघमारे यांनी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.
८ जून २०२६ रोजी खालापूर येथे आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत, १० जूनपर्यंत बोरवेल सील न झाल्यास ११ जून रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मांडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, संघटनेचे कार्यकर्ते मारुती वाघमारे व रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली वाडीतील नागरिकांनी ११ जूनपासून तहसीलदार कचेरीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. आदिवासी बांधवांनी हक्क मागण्यासाठी रात्रभर कार्यालयाबाहेर वस्ती करून, पारंपरिक नृत्य व घोषणांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू ठेवले. मध्यरात्री ३ वाजता संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे बळ वाढवले.
सलग दोन दिवस चाललेल्या या आंदोलनाची अखेर १२ जून रोजी दुपारी १ वाजता प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तहसीलदार यांनी सदरची बेकायदेशीर बोरवेल सील करून ती शासनाच्या ताब्यात घेतली. तसेच ६०० फूट खोल बोरवेल मारून पाण्याची व्यावसायिक विक्री केल्याप्रकरणी कृष्णकांत दळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) देण्यात आले. यासोबतच दळवीची पोलीस पाटीलकी रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (SDO) पाठवण्यात आला आहे.
वाडीतील नागरिकांची पाण्याची तात्पुरती अडचण दूर करण्यासाठी दिवसाला ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेशही गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी व पोलीस विभागाचे आभार मानून आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात मारुती वाघमारे, रमेश वाघमारे यांच्यासह ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गावित, ठाणे तालुका अध्यक्ष आत्माराम वाघे, ठाणे तालुका सचिव नंदा वाघे, नवी मुंबई श्रमजीवी कामगार संघटनेच्या अध्यक्ष रेश्मा कातकरी, कार्यकर्ते व रायगडमधील संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या या यशस्वी लढ्याबद्दल श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे व सभासदांचे कौतुक केले आहे.


