टिटवाळ्यात वीज प्रश्नावर नागरिक आक्रमक

एका दिवसात ७०० नागरिकांचा पाठिंबा

टिटवाळ्यातील वाढत्या वीज समस्यांविरोधात सुरू झालेल्या जनआंदोलनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
मिळत असून, केवळ एका दिवसात 700 हून अधिक नागरिकांनी सह्या करून आपल्या संतापाला वाट मोकळी
करून दिली आहे. जनतहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मांडा पूर्व येथील बँक ऑफ
महाराष्ट्रसमोर सुरू असलेल्या या मोहिमेची सध्या संपूर्ण टिटवाळ्यात जोरदार चर्चा आहे.

वारंवार होणारी वीज खंडित होणे, कमी-जास्त दाबाचा पुरवठा आणि वाढत्या गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हजारो ग्राहकांकडून नियमित महसूल वसूल केला जात असतानाही मूलभूत सेवा सुरळीत मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रितेश कांबळे यांनी लोकशाही मार्गाने नागरिकांना एकत्र आणत सह्या मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा प्रश्न आता केवळ वीजपुरवठ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो जनभावनांचा विषय बनल्याचे दिसून येत आहे.

“आज नाही तर कधीच नाही” या भूमिकेतून अनेक नागरिक आंदोलनस्थळी येत असून, आपल्या हक्कासाठी आवाज उठविण्याची वेळ आता आल्याची भावना व्यक्त करत आहेत. केवळ सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून प्रश्न सुटणार नाहीत, तर संघटित लोकशक्तीच प्रशासनाला जागे करू शकते, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान, वीज समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून आणखी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

Scroll to Top