कल्याण शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पाच कोटीचा मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत निधी मंजुर केला आहे. या रिश्रीच्या रकमेतील काही कामांमध्ये शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या सुधारित प्रस्तावाप्रमाणे बदल केले असून, या निधीतून चिंचपाडा, नेतिवली, तिसगाव भागात नवीन रस्ते आणि नवीन जलवाहिन्या टाकण्यांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी शासनाने एक कोटी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या मुलभूत सोयी सुविधा निधीतून ऑक्टोबर २०२५ च्या पालिका प्रस्तावाप्रमाणे कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक १०० तिसगाव गावठाण प्रभागातील तिसाई कमान ते स्मशानभूमीपर्यंत ८०० एमएम ते ६०० एमएम पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार होते. हे काम ५० लाख रूपये निधीचे होते. नवीन प्रस्तावाप्रमाणे या कामात बदल करण्यात आला आहे. नवीन बदलाप्रमाणे या ५० लाखाच्या निधीतून जलवाहिनीच्या कामाबरोबर या मार्गिकेतील सीमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे. कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक ४३ नेतिवली, मेट्रो मॉल, साईबाबा मंदिर, टीचर कॉलनी, त्रिसंगम सोसायटी भागात आर. सी. सी. बंदिस्त गटार आणि पायवाट बनविण्यात येणार होती. हा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून नवीन प्रस्तावाप्रमाणे प्रभाग क्रमांक ४३ मध्ये नेतिवली, मेट्रो मॉल, शक्ती कोल डेपो ते संजय किरणा स्टोअर्सपर्यंत सीमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. हे काम ४० लाख रूपयांचे आहे. तिसऱ्या प्रस्तावाप्रमाणे प्रभाग क्रमांक ४३ मध्ये नेतिवली, मेट्रो मॉल, साईबाबा मंदिर, टीचर कॉलनी ते त्रिसंगम सोसायटी भागात बंदिस्त गटार आणि पायवाट उभारण्यात येणार होती. २५ लाख रूपयांचे हे काम होते. नवीन प्रस्तावाप्रमाणे हे काम रद्द करण्यात आले आहे. नवीन प्रस्तावाप्रमाणे कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक ११८ मध्ये आशेळे, चिंचपाडा प्रभागातील ग बाळ विद्यामंदिर ते के. सी. कॉम्पलेक्स पर्यंत रस्ता सीमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. २५ लाखाच्या निधीतून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शासनाच्या नगरनियोजन विभागाचे कक्ष अधिकारी भूषण गायकवाड यांनी हा सुधारित प्रस्ताव बुधवारी काढला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे या शीर्षकांतर्गत हा निधी कल्याण डोंबिवली पालिकेला शासनाने उपलब्ध करून दिला आहे.


