हिरवे आश्रमशाळेला विज्ञान शाखेची मंजुरी

पालघर – 

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एकात्मिक आदिवासी विकास जव्हार प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा हिरवे येथे इयत्ता अकरावी व बारावीसाठी विज्ञान शाखा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार, जव्हार तालुक्यातील साकुर कन्या आश्रमशाळा, मोखाडा तालुक्यातील हिरवे आश्रमशाळेत अकरावी-बारावीसाठी कला व विज्ञान या दोन्ही शाखांना मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत विज्ञान शाखा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा असून, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाल्याने प्रगतीची दारे खुली झाली आहेत.

दरवर्षी दूरच्या शहरांचा पर्याय स्वीकारावा लागत होता. त्यासाठी निवास, प्रवास आणि शिक्षणावरील वाढीव खर्चाचा सामना करावा लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना इच्छित शिक्षण घेणे कठीण जात होते. नव्या मंजुरीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, आदिवासी भागातील शैक्षणिक विकासाला यामुळे नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने प्रवेश घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी केले आहे. हिरवे आश्रम शाळेतील मुख्याध्यापक श्री.रास्कर सर हे सेवा निवृत्ती झाल्याने हिरवे आश्रम शाळेचा मुख्याध्यापक पदाचा पदभार राजेंद्र सुसर सर यांच्या कडे असून त्यांनी व शाळेतील शिक्षकांनी विज्ञान शाखेच्या या सुविधेचे स्वागत केले आहे.




Scroll to Top