मागील दोन दिवसांपासून नागरिकांना महावितरणकडून संदेश पाठवून ४८ तासांत ‘TOD’ स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली बबलू खान, प्रकाश नलावडे, विशाल गायकवाड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला होता.
या आंदोलनादरम्यान महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांना विश्वासात न घेता किंवा त्यांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मनसेने केला. तसेच जबरदस्तीने मीटर बदलण्याचे प्रकार थांबवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नागरिकांकडून स्मार्ट मीटरविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून लोकांना हे मीटर नको आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये कोणतीही परवानगी न घेता मीटर बदलण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शैलेश शिर्के यांनी केला. या संदर्भातील निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले असून पुढील दहा दिवसांत समाधानकारक उत्तर किंवा सुधारणा झाली नाही, तर मनसे पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बुधवारपासून महावितरण कार्यालयाबाहेर मनसेचा प्रतिनिधी बसवून नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. नागरिकांच्या परवानगीशिवाय जुने मीटर काढून टाकणे हा एकप्रकारे अधिकारांचा भंग असून अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडे तक्रार कराष्ग्रात्ते आवाहनही करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लादले जाणार नाहीत, अशी भूमिका जाहीरपणे मांडली असताना काही अधिकारी वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोप करत मनसेने राज्य सरकारलाही लक्ष्य केले. मुख्यमंत्री आणि महावितरण प्रशासनाच्या भूमिकेत विसंगती दिसत असल्याचा दावा करत या प्रकरणात सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे काही काळ महावितरण कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आंदोलन पार पडले.


