आमदार संजय केळकर यांची मागणी
शहरात कोट्यवधींची तरतूद केलेल्या नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हातसफाईच अधिक होत असून अधिकारीही Preत्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नालेसफाईचा फार्स बंद करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
बाळकुम, ढोकाळी आणि कोलशेतमधील सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी आज आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत केली. त्यावेळी त्यांनी या कामातील बोगसगिरी उघडकीस आणली. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
ना अधिकारी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवत, ना ठेकेदार काम करत. त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यामुळे ठेकेदारांची बिले रोखून त्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली.
नालेसफाईच्या कामाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे, त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस न बजावता त्यांना घरी बसवा, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली.
दादलानी पार्क येथील रहिवासी गेली दोन वर्षे तक्रार करत आहेत. नाल्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आणि कचऱ्यामुळे रोगराई पसरते. असे असताना पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई अर्धवट झालेली आहे. मग आयुक्तांची १ जूनची डेडलाईन गेली कुठे ? असा संताप श्री. केळकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे आयुक्तांनीच रस्त्यावर उतरून पाहणी करावी, म्हणजे नालेसफाईच्या कामातील फोलपणा दिसून येईल, असे आवाहन श्री. केळकर यांनी केले.
पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अधिकारी संजय कदम, भाजपाचे पदाधिकारी संजय पाटील, निलेश पाटील तसेच नीरज काबाडी, भानुदास भोईर, अॅड. हेमंत म्हात्रे, रवी रेड्डी आदी उपस्थित होते.


