‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशा अपघातांच्या श्रृंखलेत रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान अपघात प्रणवक्षेत्र असलेल्या मोरीवली गाव येथील अनधिकृत रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी अपघात थांबवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफ च्या संयुक्त विद्यमाने पोलीस उपायुक्त प्रज्ञा झेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे कडून ‘झिरो डेथ’ संकल्पनेतून बुधवारी सकाळी मानवी साखळीचे आयोजन करून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना’ रेल्वे रूळ ओलांडून जाऊ नका जीव धोक्यात घालू नका’ अशा प्रकारे माईकद्वारे उद्घोषणा करून बॅनर, पोस्टरद्वारे प्रक्षेपित करून प्रबोधन करत गुलाबाचे फुल देऊन अपघात विरोधी जनजागृती करण्यात आली.
दरम्यान गेल्या तीन वर्षात या परिसरात तब्बल ४० जणांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे रूळ ओलांडून जाणे धोकादायक आणि कायदेशीर गुन्हा असताना शॉर्टकट मारण्याच्या नादात मुंबई
उपनगरीय रेल्वे (मध्य आणि पश्चिम रेल्वे) मार्गावर दरवर्षी दोन ते अडीच हजार रेल्वे अपघातात मृत्यू होत असतात. यावर्षी जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यात ७०६ प्रवाशांचा मृत्यू तर ५७५ जण जखमी झाले आहेत. हा आकडा मोठा असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून मागच्या काही वर्षांपासून मिशन ब्युरो ची संकल्पना राबविण्यात येत आहे. जेणेकरून रेल्वे अपघातांचे प्रमाण कमीत कमी करण्यात यावे याच संकल्पनेतून मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी नवीन कन्सेप्ट चालवली आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी अपघात प्रणव क्षेत्रात जाऊन रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्या प्रवासी आणि स्थानिक लोकांना विद्यार्थ्यांना जनजागृती केली जात असल्याचे पोलीस उपायुक्त प्रज्ञा झेडगे यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मोरीवली गाव परिसरात बुधवार १७ जून रोजी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी मानवी साखळी तयार करून नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडू नका, असे आवाहन केले.
रेल्वे अपघात टाळण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मध्ये रेल्वे पोलीस उपायुक्त प्रज्ञा झेडगे यांनी केले. यावेळी कल्याण विभाग लोहमार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे, आरपीएफचे वीरेंद्र सिंग यांच्यासह ७ पोलीस अधिकारी व ३५ पोलीस अंमलदार तसेच आरपीएफचे ३ अधिकारी १० आरक्षक, महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अविनाश धुरत व सदस्य, स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.


