ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिक संतप्त
प्रशांत गडगेशहापूर –
शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कळंबे-बोरशेती हद्दीत, शहापूर-आसनगाव मुख्य मार्गाच्या दुतर्फा तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या निष्काळजी कारभारामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात कचरा संकलन आणि विल्हेवाट व्यवस्थापनाचा प्रश्न नवीन नसून अनेक महिन्यांपासून वारंवार उद्भवत आहे.
ग्रामपंचायतीकडून कचरा उचलण्यासाठी कंटेनर ठेवण्यात आले असले तरी त्याची नियमित साफसफाई होत नसल्याने कचरा कंटेनरमधून बाहेर सांडून रस्त्यावर पसरत आहे. काही ठिकाणी नागरिकांकडूनही उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.विशेष म्हणजे, दिवाणी व फौजदारी न्यायालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयासमोरच कचऱ्याचे ढीग पडलेले असल्याने प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज या मार्गावरून न्यायालयीन कर्मचारी, वकील, पक्षकार तसेच शेकडो नागरिकांची वर्दळ असते. मात्र दुर्गंधी, माशा आणि भटक्या प्राण्यांचा वाढता वावर यामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे.
कचऱ्याच्या ढिगांमुळे डासांची पैदास वाढण्याची शक्यता असून पावसाळा जवळ येत असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्यामुळे वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.स्थानिकांच्या मते, ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छ भारत अभियान आणि शासनाच्या विविध स्वच्छता मोहिमांचा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र कळंबे-बोरशेती ग्रामपंचायतीच्या हद्दीत अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत आहे.
नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“न्यायालयासमोर आणि मुख्य रस्त्यालगत इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा साचत असेल, तर ग्रामपंचायत प्रशासन नेमके काय करत आहे? स्वच्छतेच्या बाबतीत जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.”
शिवाजी देशमुखस्थानिक नागरिक


