महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश, नगरसेवक भरत चव्हाण यांचा पुढाकार
उल्हासनगर शहरातील सिंधी बांधवांच्या घरांना मालकी हक्क देण्यासाठी सुरू झालेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर कोपरीतील सिंधी बांधवांनाही हक्कांचे घर देण्यासाठी पहिले पाऊल पडले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरांचा मालकी हक्क देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तपासणी करण्याचे मंगळवारी निर्देश दिले. या प्रश्नावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पुढाकार घेऊन, सिंधी बांधवांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उल्हासनगर येथील सिंधी बांधवांच्या २०११ पूर्वीच्या घरांना सनद दिल्यानंतर मालकी हक्कासाठी प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर कोपरीतील १५ ते २० हजार सिंधी बांधवांनांही प्रॉपर्टी कार्ड मिळावे, यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या जनसंवाद’ कार्यक्रमात नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिंधी समाजबांधव राजेश भटिजा, महेश बुधवानी, ओमकार चव्हाण, शिवाजी रासकर यांच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. कोपरी येथील सिंधी वसाहतीत ७५ वर्षांपासून सिंधी बांधव राहत आहेत. त्यांच्याकडे १ जानेवारी २०११ पूर्वीचे वास्तव्याचे पुरावे आणि सनद आहेत. उल्हासनगर येथील सिंधी बांधवांप्रमाणेच सध्या वापरात असलेले क्षेत्र रेडीरेकनर दराच्या ५ टक्के रक्कम भरून सनद व मालकी हक्क प्रदान करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली. त्यावेळी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी करून कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.


