स्मार्ट मिटर बसवण्यासाठी महावितरणचा बडगा

सुविधांची मात्र बोंबाबोंब, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

आदिवासी बहुल मोखाडा तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती महावितरणने ग्राहकांवर केली आहे. ज्यांनी स्मार्ट मिटर बसवलेले नाही, त्यांना कायद्याचा धाक आणि सेवा खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, रोजच दिवसातून अनेक तास विज पुरवठा खंडित होत असल्याने, नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. सुरळीत सेवा मिळत नसल्याने, विज ग्राहक आणि महावितरणचे अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत आहे. सुरळीत सेवा नसतांना स्मार्ट मिटर बसवण्याचा अट्टाहास अधिकारी कशासाठी करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

मोखाडा तालुक्यात महावितरणचे बारा हजारांहून अधिक वीज ग्राहक आहेत. त्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणची दमछाक होत आहे. दिवसा अथवा रात्री कधीही विजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून होत असलेल्या खंडित विज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नागरीकांना सुविधा पुरविण्यात महावितरण अपयशी ठरत असतांना, स्मार्ट मिटर बसवण्याचा तगादा सुरू झाला आहे. ज्या विज ग्राहकांनी स्मार्ट मिटर बसवण्यास नकार दिला आहे किंवा ज्यांनी हरकत घेतली आहे, अशा ग्राहकांना महावितरण ने नोटीसा बजावल्या आहेत. तसेच ४८ तासांत नवीन स्मार्ट मिटर बसवण्याची सक्ती केली आहे. केंद्र सरकार च्या निर्णयाचा संदर्भाचा दाखला देत आणि विज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईचा इशारा महावितरण कडून ग्राहकांना देण्यात आला आहे.

मोखाड्यात विजेचा लपंडाव रोजच सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच मोखाड्यातील आदिवासी वीज ग्राहकांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये, अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे त्या विरोधात आंदोलन छेडेल.

Scroll to Top