समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापना निश्चित
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख पदाच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने पूर्ण करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या उपस्थितीत दि. १९ जून, २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित समुपदेशन कार्यक्रमात ४९ प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली. “केंद्रप्रमुख हे शैक्षणिक व्यवस्थेतील महत्त्वाचे नेतृत्व करणारे घटक आहेत. शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच शिक्षकांना प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता व न्याय्यतेची तत्त्वे जपण्यात आली आहेत. नवनियुक्त केंद्रप्रमुखांनी आपल्या नेतृत्वातून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले. सदर पदोन्नती प्रक्रियेसाठी एकूण १२३ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८५ उमेदवार पात्र ठरले असून ३४ उमेदवार अपात्र ठरले. दिव्यांग प्रवर्गातील ५ उमेदवार पात्र ठरले होते. सर्वसाधारण गटातील ४९ रिक्त केंद्रप्रमुख पदे भरण्यासाठी गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक १ ते ५१ मधील उमेदवारांना (अनुक्रमांक १७ व १९ वरील अपात्र उमेदवार वगळून) समुपदेशनासाठी संधी देण्यात आली. समुपदेशनादरम्यान गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक ५१ वरील गोपाळ रोहिदास म्हात्रे यांनी केंद्रप्रमुख पदाची पदस्थापना स्वीकारण्यास लेखी नकार दिल्याने गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक ५२ वरील दिपाली विजय बडगुजर यांना केंद्र निवडीची संधी देण्यात आली. याप्रमाणे गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक १ ते ५२ मधील उमेदवारांपैकी दोन अपात्र उमेदवार व एका उमेदवाराचा नकार वगळता एकूण ४९ उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेद्वारे समूह साधन केंद्रांची निवड करून पदस्थापना निश्चित केली.
यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


