भिवंडीतील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून – शिवसेना शिंदे गटात गेलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करून – मारहाणीची धमकी दिली. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून राज्यातून खासदार संजय पाटील याचा निषेध नोंदवला जात आहे. भिवंडीत सर्व पत्रकारांनी महानगरपालिका प्रवेश द्वाराबाहेर

एकत्र येत खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाचा निषेध नोंदविला. त्यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भिवंडी चे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांची भेट घेऊन पत्रकार सुरक्षितता कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारे निवेदन दिले. पत्रकारांशी अशा प्रकारची अरेरावी व धमकीची भाषा वापरणे हे लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या कथित धमकीची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी व गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते.

Scroll to Top