ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोपरी येथील लख्मीचंद फतिचंद रूग्णालयातील नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या १८ बेडसच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (२६ जून) करण्यात आले.
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, उपायुक्त मनिष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, डॉ. धायगुडे, डॉ. समिथा गोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पस्थित होते.
शेठ लखमीचंद फतिचंद प्रसुतीगृह हे अनेक वर्षांपासून परिसरातील सर्वसामान्य, कामगार व झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रसूतीगृह राहिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले. महिलेची प्रसूती झाल्यानंतर जर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किवा इतरत्र हलवावे लागत होते. पण आता याच ठिकाणी 18 बेडसचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावे लागणार नाही. आजपासून अत्याधुनिक नवजात शिशू अतिदक्षता विभाग नागरिकांच्या सेवेत दाखल झाला असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
कोविड काळात ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले. त्या काळात आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. खुशबू टावरी, डॉ. समिधा गोरे तसेच अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या सेवेमुळे ठाणे शहरात कोविड नियंत्रणात ठेवणे शक्य झाल्याचा उल्लेख खासदार नरेश म्हस्के यांनी आवर्जुन केला. त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना भविष्यातही नागरिकांना २४ तास दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले.
आज अत्याधुनिक १८ खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.
स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले व सुसज्ज अशा अतिदक्षता विभागामुळे कोपरीकरांना दिलासा मिळाला असून या कक्षात 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केल्याबद्दल प्रशासनाला देखील धन्यवाद दिले.


