नाशिक महामार्गावरील मोखाडा चौफुली येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर भरधाव पिकअप वाहन घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत नाकाबंदीसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड्सचे नुकसान झाले असून वाहनाचा पाठलाग केल्यानंतर ते निळमती गावाजवळ घाटरस्त्यात पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी पहाटे समारे ५.१५ वाजता मोखाडा चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी महिंद्रा पिकअप चालक रिजवान मुबारक अली शेख (वय २२) याला वाहन थांबवण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, त्याने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत बॅरिकेड्सना धडक देऊन नाशिकच्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर निळमती गावाजवळ घाटरस्त्यात संबंधित वाहन पलटी झाल्याचे आढळले. या प्रकरणी रिजवान मुबारक अली शेख, इम्तियाज अब्दुल्ला फारुक आईनापुर आणि तौफिक (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.


