भिवंडी महापालिका हद्दीत पल्स पोलिओ मोहिमेचा उपमहापौरांच्या हस्ते शुभारंभ

भिवंडी महानगरपालिका हद्दीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ भिवंडी शहराचे उपमहापौर तारिक मोमीन यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा मेमोरियल रुग्णालय येथे करण्यात आला.

या कार्यक्रमास भिवंडी महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, ठाणे जिल्ह्याचे सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ. अरुण काटकर, आरसीएच अधिकारी डॉ. वर्षा बारूड चौधरी, संबंधित परिसराच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुकैया कुरेशी तसेच नदी नाका हेल्थ पोस्टचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी हेल्थ पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर फीत कापून पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात मागील २४ तासांत जन्मलेल्या सर्व २१ नवजात बालकांना त्यांच्या आयुष्यातील पहिला पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी सांगितले की, भिवंडी महानगरपालिका हद्दीतील ० ते ५ वर्षे वयोगटातील ७८ हजार ७५८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी शहरभर ३७० पोलिओ बूथ तसेच ५१ ट्रान्झिट व मोबाईल पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी एकूण १,२१२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या देखरेखीसाठी ११० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही पल्स पोलिओ मोहीम सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू होती. पुढील पाच ते सात दिवसांत घरोघरी भेट देऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. भिवंडी महानगरपालिकेने सर्व पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत आणि पोलिओमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे.

Scroll to Top