महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेमधून नुकतीच क्रीडा सेनेची स्थापना करण्यात आली असून क्रीडा सेनेचे अध्यक्ष म्हणून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा सेनेचा राज्यामधील विस्तार, क्रीडा सेनेची बांधणी, कोर कमिटी, क्रीडा सेनेचे धोरण, रचना उपक्रम आणि राज्यातील पुढील दिशा या संदर्भात क्रीडा सेनेचे मार्गदर्शक आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक क्रीडा संघटना व खेळाडू क्रीडा सेनेबरोबर कसे जोडले जातील, तसेच राज्यामध्ये क्रीडा सेनेचा विस्तार, क्रीडा सेनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा महोत्सव आयोजित करून राज्यांमधील क्रीडा संस्कृतीला चालना देऊन राज्यातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हेतू क्रीडा सेनेचा असल्याचे सांगितले. यावेळी क्रीडा सेनेचे अध्यक्ष आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आणि राज्य क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे उपस्थित होते.


