मिरा-भाईंदर महापालिका महापौर व आयुक्त यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण

मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित शालोपयोगी कार्यक्रम अंतर्गत १ जुलै रोजी महानगरपालिका काशीगाव शाळा क्रमांक ४ मराठी माध्यम व शाळा क्रमांक ५ उर्दू माध्यम मधील विद्यार्थ्यांना शालेय जीवनासाठी आवश्यक असलेले शालेय गणवेश, दप्तर तसेच शालेय बूट यांचे वितरण महापौर डिम्पल मेहता व आयुक्त राधाबिनोद शर्मा

यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर, महापालिकेच्या ३१ शाळांमध्ये हा उपक्रम राबवून अधिकारी/पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती क्रमांक ४ चे सभापती संजय थेराडे, स्थानिक नगरसेविका/नगरसेवक ज्योत्स्ना हसनाळे, रूपाली मोदी, यशोदा ताटे, विजया वैती, तुषार पारधी, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त (शिक्षण) कविता बोरकर, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महापौर डिम्पल मेहता यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत उपस्थित राहून मन लावून शिक्षण घेण्याचे, शिस्त, संस्कार आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. महानगरपालिका विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेचा पूर्ण विकास करून उज्ज्वल भविष्य घडवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र. से.) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हेच यशस्वी भवितव्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगत, शिक्षणासोबतच कौशल्य विकास, वेळेचे नियोजन, स्वच्छतेच्या सवयी आणि सामाजिक जबाबदारी यांनाही तितकेच महत्त्व असल्याचे नमूद केले. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वांगीण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवत असून, विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या जीवनात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ३१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. यामध्ये १६ मराठी माध्यमाच्या, ५ उर्दू माध्यमाच्या, ५ हिंदी माध्यमाच्या आणि ५ गुजराती माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने ९ सुसज्ज विज्ञान व तंत्रज्ञान शाळा विकसित केल्या आहेत. तसेच सर्व शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड कार्यान्वित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळत आहे. काही शाळांमध्ये टॅब लॅब आणि संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात, नवोपक्रमशीलतेत आणि कौशल्य विकासात भर पडत आहे.

Scroll to Top