नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे
पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.
अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरुन पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश गावेली त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यास शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मृणाल पेंडसे, उपआयुक्त जी. जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, सहायक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी राणी शिंदे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, गुणवंत झांबरे, स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जांभळी नाका येथील पेढया मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली. पेढ्या मारूती परिसर, महाजनवाडी हा सखल भाग असल्याने या ठिकाणी थोडासा पाऊस झाला तरी पाणी साचते, पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी पंप बसविण्यात आले असून क्रॉस कलव्हर्टची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी 24 तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या.
वंदना एस.टी डेपो हा परिसर पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी साचते या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसविण्यात आलेल्या पंपाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी कार्यरत असलेला पंप बंद पडल्याने तात्काळ नवीन पंप बसविण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क रहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी नमूद केले. गुरूद्वारा परिसरात मेट्रोचे काम सुरू असून त्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याचे निदर्शनास येताच महापौरांनी तात्काळ सदर ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना सूचना संबंधित प्राधिकरणांनी कराव्यात असे निर्देश दिले.


