पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी शहरातील अवास्तव वाढलेल्या, वाकलेल्या, वाळलेल्या तसेच धोकादायक झाडांचे तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.
नुकत्याच मुंबई येथे झाड कोसळून एका शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
या घटनेची दखल घेत, मिरा-भाईंदर शहरात भविष्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच पावसाळा व वादळी हवामानाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेस कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील सर्व धोकादायक झाडांची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वेक्षणादरम्यान झाडांची सद्यस्थिती तपासून संबंधित झाड पूर्णपणे मुळासकट काढणे आवश्यक आहे की केवळ धोकादायक फांद्यांची छाटणी करणे पुरेसे आहे, याबाबत तांत्रिक निकषांनुसार वर्गीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक धोकादायक झाडाचे स्पष्ट छायाचित्र घेऊन त्याची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, शक्य असल्यास GPS टॅगिंगसह छायाचित्रे संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील कार्यवाही अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नोंदवहीच्या दृष्टीने सक्षम होणार आहे. आयुक्तांनी संबंधित विभागांना सर्वेक्षण पूर्ण करून आवश्यक उपाययोजनांसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अहवालामध्ये धोकादायक झाडांची संख्या, त्यांचे स्थान, करण्यात येणारी कार्यवाही तसेच प्राधान्यक्रमानुसार आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर काम अत्यंत आपत्कालीन स्वरूपाचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दुर्लक्षामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित असून, धोकादायक झाडे, नाले, जलनिस्सारण व्यवस्था तसेच आपत्कालीन यंत्रणा सतत कार्यरत ठेवण्यात येत आहेत.


