महापौर सुजाता पाटील यांनी केली दुर्घटना स्थळांची व नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी

पावसाळी कालावधीतील क्षेत्रीय स्तरावरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा फिल्डवर जाऊन घेताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शहाबाज बेलापूर व जुहूगाव वाशी या ठिकाणी घडलेल्या इमारत दुर्घटना स्थळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तेथील रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दिलासा देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

दि. ४ जुलै रोजी से – १९ शहाबाज गाव, बेलापूर येथील अविघ्न सोसायटी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब पडण्याची घटना घडलेली आहे. या इमारतीमध्ये १७ कुटूंब वास्तव्यास होती. सदर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून या कुटुंबांना महापालिकेच्या वारकरी भवन, बेलापूर येथील तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यापैकी काही कुटुंबे त्यांच्या नातेवाईकांकडे गेली असून एक कुटुंब निवारा केंद्रामध्ये आहे. सदर इमारतीच्या ठिकाणी भेट देत तेथे उपस्थित असलेल्या इमारतीतील रहिवाशांशी महापौरांनी संवाद साधला. यावेळी रहिवाशांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावर महापौरांनी इमारतीची महापालिकेमार्फत स्ट्रक्चरल तपासणी झाल्यानंतर घरामध्ये असलेले त्यांचे आवश्यक सामान काढण्यासाठी परवानगी देता येईल असे सांगितले. जेणेकरुन इमारतीत गेल्यानंतर आणखी काही दुर्घटना घडायला नको. याकरिता सर्व रहिवाशांनी सहकार्य करावे असेही आवाहन महापौरांनी केले. महापालिकेने तत्परतेने स्ट्रक्चरल तपासणी करुन घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या ठिकाणी उपायुक्त डॉ. अमोल पालवे व सहा. आयुक्त प्रशांत नेरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top