भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एस.आय.आर.) कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय आणि सहकार्य ठेवून काम करावे, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
नुकतेच कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरात मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी आवश्यक असणारे मतदानकेंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA-राजकीय पक्षांचे प्रतिनिधी) नेमण्याबाबत गतआठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील चारही मतदारसंघांमध्ये नेमण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना या मोहिमेचे नेमके महत्त्व कळावे, या उद्देशाने या विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित प्रतिनिधींना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत स्वतः सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीला कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, महानपालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, प्रांत अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी वरुणकुमार सहारे, महापालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे आणि तहसिलदार विकास गारुडकर यांच्यासह कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील १३८, १४२, १४३ व १४४ या चारही विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मार्गदर्शनादरम्यान महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनीही उपस्थितांना संबोधित केले. निवडणूक आयोगाची ही मोहीम अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची असून, क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव सुयोग्यरित्या समाविष्ट झाले आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले.
या बैठकीच्या समारोपानंतर जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ, महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी स्वतः प्रत्यक्ष कल्याणामधील मतदारांच्या घरी भेट दिली.


