कोकण विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या जलस्तरात मोठी वाढ झाली आहे. ७ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोकण विभागातील एकूण २७ प्रमुख नद्यांपैकी ४ नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, उर्वरित सर्व नद्या सध्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याचे निशाण पार केल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीने २३.९५ मीटर या आपल्या धोका पातळीवरुन २३.३० मीटरवर (इशारा पातळी २३.०० मीटर) पोहचली आहे, तर अंबा नदी २०० मीटरची धोका पातळी ओलांडून १२.०५ मीटरची पातळी गाठली आहे. महाडमधील सावित्री नदी ६.५० मीटरची धोका पातळी ओलांडून ७.३५ मीटरवर वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने देखील ७.०० मीटर या आपल्या धोका पातळीच्या वर जात ७.६० मीटरची पातळी गाठल्याने या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या ४ नद्या वगळता कोकणातील इतर सर्व प्रमुख नद्या सध्या नियंत्रण आखत्यात आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील उल्हास नदी बदलापूर येथे १५.३० मीटर (धोका पातळी १७.५० मीटर) आणि जांभूळपाडा येथे १२.७० मीटर (धोका पातळी १४.०० मीटर) वर वाहत आहे. कल्याणमध्ये उल्हास नदी (मोहन) ८.८० मीटर (धोका पातळी 10.00 मीटर) आणि टिटवाळ्यातील काळू नदी १०१.७० मीटर (धोका पातळी १०३.५० मीटर) आणि शहापूरमधील भातसा नदी ३३.२० मीटरवर स्थिर आहे. पालघर जिल्ह्यातही परिस्थिती नियंत्रणात असून पालघर तालुक्यातील सूर्या नदी १०.३५ मीटर, वैतरणा १०१.४० मीटर आणि पिंजाळ नदी १०२.५० मीटर पातळीवर वाहत आहे, ज्या त्यांच्या धोका पातळीपेक्षा कमी आहेत.
रायगड जिल्ह्यातील अन्य नद्यांमध्ये पनवेलची पाताळगंगा २०.१० मीटर व गाढी नदी ४.६० मीटरवर, तसेच कर्जत येथील उल्हास नदी ४६.९० मीटरवर वाहत असून या नद्यांनी अद्याप इशारा पातळी गाठलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित नद्यांमध्ये चिपळूणची वशिष्टी ४.३४ मीटर, संगमेश्वरमधील शास्त्री ५.०० मीटर, सोनवी ४.६० मीटर व बावनदी ६.३५ मीटरवर वाहत आहे. लांजा तालुक्यातील काजळी १५.०० मीटर व मुचकुंदी १.६० मीटरवर, तर राजापूरची कोदवली नदी २.०५ मीटरवर प्रवाहित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच नद्या मर्यादेत असून दोडामार्ग येथील तिलारी ३८.६० मीटर, सावंतवाडीतील तेरेखोल २.३० मीटर, कुडाळमधील कर्ली ५.०० मीटर, कणकवलीची गडनदी ३५.०० मीटर आणि वैभववाडीतील वाघोटन नदी ५.५० मीटर पातळीवर वाहत आहे. सर्व पूरग्रस्त आणि संवेदनशील भागात स्थानिक प्रशासनाचे बारीक लक्ष असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


