र्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या सेवा सहयोग फाऊंडेशनच्या विद्यार्थी विकास योजनेचा एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे ‘भारतरत्न महर्षि धोंडो केशव कर्वे पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. रविवारी पुण्यात विद्यापीठाच्या आवारात आयोजित एका समारंभात राज्यपाल ि जिष्णू देव देव शर्मा यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य प्रवर्तक रवींद्र कर्वे आणि संजीव करंदीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या सन्मानामुळे संस्थेच्या विद्यार्थी विकास, शाळा उभारणी आणि सामाजिक समतेच्या दिशेने सुरू असलेल्या दीर्घकालीन प्रयत्नांचा गौरव होऊन त्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास आहे.
रविवारी पुरस्कार वितरण सोहळ्यास सेवा सहयोगचे अध्यक्ष अतुल नागरस, अनिरुद्ध देशपांडे, अमेय पालक, ‘घरकुल’चे अविनाश बर्वे आणि नंदिनी बर्वे, सीओईपीचे कुलगुरू सुनील भिरूड, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, तसेच रायगड, बीड, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते सेवा सहयोग फाउंडेशनने गेल्या काही वर्षांत पारदर्शकता, डिजिटल व्यवस्थापन आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांच्या आधारे एक विश्वासार्ह आणि परिणामकारक शैक्षणिक चळवळ उभी केली आहे. संस्थेचे कार्य केवळ आर्थिक सहाय्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी एक व्यापक सामाजिक प्रक्रिया बनले आहे.
विद्यादान हेच श्रेष्ठ दान’ या विचारातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाला २०१३ पासून अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आणि त्यानंतर तो एक सशक्त सामाजिक चळवळ म्हणून विकसित होत गेला.
संस्थेकडे ६२३ दाते आणि ५०० हून अधिक शुभचिंतकांचा मजबूत आधार आहे. संस्थेने आतापर्यंत एकूण ₹४६.५३ कोटींचा निधी शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे संस्थेचा प्रशासकीय खर्च केवळ २.५६% इतका असून सर्व व्यवहार १००% डिजिटल आणि पारदर्शकपणे केले जातात.
आतापर्यंत संस्थेतर्फे २,८९५ विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत देण्यात आली आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्याथ्यांना केवळ आथिक सहाय्यच नव्हे, तर करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू झाला असून त्यांना स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळाला आहे.
ग्रामीण आणि मागास भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी संस्थेने शाळा विकासावरही मोठा भर दिला आहे. आतापर्यंत शाळा बांधकाम आणि पायाभूत सुविधांसाठी ₹८.७९ कोटींची खर्च करण्यात आला असून, या प्रयत्नांमुळे अनेक शाळांना नवी दिशा मिळाली आहे. शिक्षणाची गुणवत्ता व सुविधा दोन्ही सुधारल्या आहेत.
सेवा सहयोग फाउंडेशनचे कार्य महाराष्ट्रातील ३५ जिल्हे आणि २०७ तालुक्यांपर्यंत पोहोचले आहे. देशातील इतर काही राज्यांमधील विद्यार्थ्यांनाही संस्थेने प्रातिनिधीक स्वरूपात अर्थसहाय्य केले आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणारी राज्यातील एक प्रमुख संस्था अशी संस्थेची ओळख आहे.
संस्थेच्या ‘विद्यार्थी विकास’ उपक्रमातून घडलेल्या शिक्षण घेतलेले सातशेहून अधिक विद्यार्थी आता नोकरी, व्यवसायात स्थिरावले असून त्यांनी आतापर्यंत पुढील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ८५ लाख रूपये संस्थेकडे जमा केले आहेत. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीत त्यांनीही हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.


