वासिंद-वाडा मनोर वाहतूकीवर परिणाम
वासिंद – कांबारे या रस्त्यावरील सावरोली पुलावरून दुपारच्या वेळी काही काळ पाणी वाहत असल्याने वासिंद-वाडा, मनोर व गुजरात कडे ये-जा करणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊन या वाहतूकीवर परिणाम झाला.
शहापूर सार्वजनिक बांधकाम अंतर्गत असलेल्या वासिंद-कांबारे या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यावर सावरोली गावाजवळ तानसा नदीवर हा पुल आहे. सध्या पावसाचा जोर अधिक असल्याने दुपारच्या वेळी या पूलावरुन पाणी ओसंडून वाहू लागले. यामुळे दोन्ही कडील वाहतूक काही काळ ठप्प झाली असे येथीलसामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, बंडू किसले यांनी सांगितले तर त्यामुळे काही वाहनचालकांना कांबारे-अघई मार्गे असा जास्त अंतराचा प्रवास करावा लागला. गेल्या तीन चार दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प व जनजीवन विस्कळित झाले तसेच काही ठिकाणी अनेक नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. सदर, या पुलाला मागील वर्षी तडा गेल्यामुळे या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. सध्या पावसाचा जोर वाढल्याने दुपारी पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीवर काही वेळा पर्यंत परिणाम झाला.


