पाऊस की आपत्ती-भीषण वास्तव

पण लहान असताना ‘सांग सांग भोलानाथ… पाऊस पडेल का’ हे गाणं गायलं आहे, पण असं शाळे भोवती तळे साचून सुट्टी वगैरे नाही मिळाली हो कधी. हल्ली शहरांमध्ये मुलांनाच काय पण मोठ्यांदेखील पावसाळी सुट्टी मिळते; सुरक्षिततेच्या दृष्टीने सुट्टी द्यायलाच हवी. पण आता भोलानाथ ने आपले गाणे फारच ऐकले म्हणायचे की निसर्गच आपल्यावर रुसला म्हणायचा यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

आधीच्या काळात खूप पाऊस पडून कोकण किनारपट्टी, कृष्णा, गोदावरी तापी यासारख्या नद्यांना महापूर किंवा मुंबई सारख्या शहरातील सखल भागात पावसाचं पाणी साचलं अश्या बातम्या असायच्या; पण हल्ली मात्र पुणे, मुंबई सारख या शहरांमध्ये हे पूराचे प्रमाण वाढतच चालले आहे. ग्रामीण भागात ओला दुष्काळ जाहीर करतांना मोठ्या शहरांमध्ये पुरस्थितीत बघायला मिळते.

खरं तर पाऊस म्हणजे जिवन, पाऊस म्हणजे पिकपाणी, पाऊस म्हणजे हिरवागार निसर्ग आणि पावसाळी सहलीचा आनंद. पण हल्लीचा पाऊस म्हणजे तो अनेकदा भीती, असुरक्षितता आणि मोठ्या संकटाचे प्रतीक बनू लागला आहे. अचानक येऊन आणि भयानक परिस्थिती निर्माण करतोय. खरे तर यात दोष त्याचाच आहे का, तर तसे नाहीच मुळी; कारण आपणच निसर्गाला कमी समजायला लागलो आणि त्याच्या हद्दीत जाऊन अतिक्रमण करू लागलो. जिकडे नजर जाईल तिकडे नवीन बांधकामे सुरू झालेली दिसतात, काँक्रिटिकारणांमुळे नदीपात्रे अरुंद होऊ लागली आहेत, जंगलतोड करणे, डोंगरच्या डोंगर पोखरून एक भाग दुसऱ्या भागाला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘मिसिंग लिंक’ किंवा ‘कनेक्टिंग लिंक’ उपलब्ध करून घेताना आपण आपण निसर्गाश ‘डिसकनेक्ट’ होतोय का? हे बघायला हवे. कारण आपण जितके ग्लोबल होत आहोत तितकेच ग्लोबल वॉर्मिंग वाढायला लागले आहे. परिणामी कधी कडाक्याच्या उन्हाचा तडाखा तर कधी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अनेकदाआपण निसर्गाचे नियम मोडतो आणि त्याचे परिणाम आपल्याला आपत्तीच्या रूपाने भोगावे लागतात.

हल्ली हवामानातील बदलांमुळे पावसाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पूर्वी चार महिने पडणारा पाऊस आता काही दिवसांत मुसळधार कोसळतो. ढगफुटी, अतिवृष्टी, पूर, भूस्खलन यासारख्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. शहरांमध्ये रस्ते जलमय होतात, वाहतूक ठप्प होते, घरे पाण्याखाली जातात आणि जनजीवन विस्कळीत भागात पिकांचे प्रचंड नुकसान होते,

शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आणि अनेक कुटुंबांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरते.
प्रश्न फक्त पावसाचा नाही, तर आपल्या नियोजनाचाही आहे. आपत्ती टाळता येत नसली तरी तिची तीव्रता नक्कीच कमी करता येते. पर्यावरणाचे संवर्धन, वृक्षारोपण, जलनियोजन, नदीनाल्यांची स्वच्छता, शास्त्रशुद्ध नगररचना करायला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशासन आणि स्थानिक संस्था कसोशीने बचतकार्य करतात. परंतु, आता प्रत्येक नागरिकात नागरिकशास्त्र विषयाची जनजागृती करण्याची गरज आली आहे.

कारण प्रत्येक वेळी प्रशासन किंवा सरकारकडे बोट दाखवताना चार बोटं एक नागरिक म्हणून आपल्याकडे आहेत हे विसरायला नको.

आता ‘हवामान बदल’ हा भविष्यातील प्रश्न नसून वर्तमानातील वास्तव आहे, हे आता स्वीकारावे लागेल. पाऊस हा जीवनाचा आधार आहे; पण त्याचे आपत्तीत रूपांतर होऊ नये, यासाठी निसर्गाशी सुसंवाद राखणे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्रत्येक पावसाळा आनंदाचा न राहता भीतीचा ऋतू ठरेल. म्हणूनच पावसाला दोष देण्यापेक्षा आपण केलेल्या चुका सुधारण्याची वेळ आता आली आहे. कारण निसर्ग नेहमी इशारे देतो; प्रश्न एवढाच आहे की ते ऐकण्याची तयारी आपण ठेवतो का? आणि पाऊस हा निसर्गाचा अनमोल आशीर्वाद आहे; तेव्हा निसर्गाचा सन्मान करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.

Scroll to Top