डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास आरोग्य कर्मचाऱ्यांना देतानाच ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही आदित्य यांनी सांगितले. रमेश म्हात्रे याला केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे, त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. यावेळी बोलतांना आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळेच रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई होत नाही, असा गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर केला. मुख्यमंत्री रमेश म्हात्रे, यांच्यावर कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करणार का ? असा सवाल उपस्थित केला. एकीकडे ‘लाडकी बहीण’ म्हणायचे, मग तिच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित करत लाडकी बहीण की लाडका रमेश म्हात्रे? असा टोला लगावला. रमेश म्हात्रे यांना तात्काळ अटक करून नगरसेवकपद रद्द करावे आणि भविष्यात निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.


