भिवंडीत पावर लूम कारखाना कोसळल्याची दुर्घटना; दोन किरकोळ जखमी

भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरातील फातिमा नगर येथील १०० फुटी रस्त्यालगतच्या न्यू आजमी कंपाऊंड मधील ताज हॉटेल जवळील सलमा अन्वर खान यांच्या मालकीचा यू एस टेक्सटाइल नावाचा लूम कारखाना शनिवारी सकाळच्या सुमारास अचानकपणे कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान सुदैवाने या दुर्घटनेवेळी कामगारांची जेवणाची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेत दोन कामगार किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री नगर येथील शंभर फुटी रस्त्यालगत असलेला लूम कारखाना सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानकपणे कोसळला. दरम्यान सदर दुर्घटनेच्या काही वेळ अगोदर कारखान्यात काही कामगार काम करत होते. मात्र कामगारांची जेवणाची सुट्टी झाल्याने ते जेवणासाठी घरी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कारखान्यात काम करत असलेल्या तीन कामगारांपैकी दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर या परिसरातील अनेक कारखान्यांना महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारत असल्याबाबत नोटीस बजावूनही सदर कारखाने सुरूच असून, कारखाने अनधिकृत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर, अनधिकृत आणि धोकादायक कारखान्यांना नोटीसा बजावूनही लूम मालक कारखाने खाली करत नाही, याबाबत आयुक्त अनमोल सागर यांनी बैठक घेवून संबंधित कारखाने मालकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त (मुख्यालय) सपना वसावा यांनी दिली आहे.

Scroll to Top