अयोध्येत देणग्यांवर डल्ला मारणाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल करा

देशभरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील रामल्लाच्या दानपेटीत गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत लाखो भक्तांनी कोट्यवधी रूपयांचे दान देणगीच्या रुपाने जमा केले. या सर्व देणग्यांचे योग्य नियोजन आणि विनीमय करणे हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे काम होते. पण, या विश्वस्तांच्या बेशिस्तपणामुळे या दानपेटीतील देणग्यांमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे. हा रामभक्तांच्या श्रध्देवर घाला आहे. त्यामुळे हा गैरव्यवहार करणाऱ्या सर्व विश्वस्तांवर सहभागी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी कल्याण शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नवीन सिंग यांनी कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या चरिष्ठांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनावर कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या ५० हून पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. सिंग यांच्या पुढाकाराने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन सुरू केले. हे निवेदन देताना राम, लक्ष्मण, सितेच्या वेशातील सजवलेले प्रतिकात्त्मक कलाकार उपस्थित ठेवण्यात आले होते.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर मागील दोन वर्षापासून लाखो भाविक अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेऊन आले. यावेळी कोट्यवधी रुपयांचे दान भक्तांनी मंदिरातील ३५ दानपेट्यांमध्ये श्रध्देने जमा केले. या देणग्यांचे योग्य नियोजन आणि विनिमय करण्याची जबाबदारी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट विश्वस्तांची होती. तरीही या विश्वस्तांसह कर्मचाऱ्यांनी कट कारस्थान, संगमनत करून भक्तांच्या दानपेटीतील देणग्यांमध्ये कोट्यवधीचा घोटाळा केला.

या गैरव्यवहारामुळे भक्तांच्या श्रध्देला तडा गेला आहे. त्यामुळे या गैरव्यवहारातील सर्व दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा.

Scroll to Top