पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी कपिल पाटील फाऊंडेशनचा मदतीचा हात

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी मोठ्या भक्तिभावाने पायी प्रवास करीत असतात. रथयात्रा आणि पालख्यांसोबत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचणाऱ्या भाविकांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा मानून कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे दरवर्षी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात.

फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा, आवश्यक औषधे तसेच ब्लँकेट, छत्र्या आणि इतर उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. शेकडो किलोमीटरच्या पायी प्रवासादरम्यान थकवा, पायदुखी, जखमा, ताप तसेच अन्य आरोग्य समस्यांचा सामना करणाऱ्या भाविकांना वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत फाऊंडेशन त्यांना आधार देत आहे.

या सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून सोमवारी जेजुरी मंदिराजवळील शिवरी गावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आणि शंकरराव मुगुटराव कांते कनिष्ठ विद्यालयाच्या प्रांगणात विशेष मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत पायी जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार देण्यात आले तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

शेकडो किलोमीटरचा प्रवास करून थकलेल्या भाविकांना या वैद्यकीय शिबिरामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे डॉ.गाजेंगी मल्लेशम यांनी सांगितले. भाविकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे देण्यात आली. तसेच प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉक्टरांनी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले.

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता तासन्तास भाविकांची सेवा करणे हे मानवतेच्या भावनेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. विशेष म्हणजे भिवंडीतील पद्मानगर परिसरातील तेलुगू डॉक्टर दरवर्षी या सेवा उपक्रमात सहभागी होत असून त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली आहे.

भिवंडी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर गाजेंगी मल्लेशम, चेक्करकोटा रमेश, मच्चा श्रीनिवास आणि मंचिगटला रमेश यांनी वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्यासोबत तातिकोंडा संपत, गाली श्रीनिवास, पूला अरविंद, रच्चा मधू, वेल्दी राकेश, दोर्नाला सागर, राकेश राणा, राजेश भानुशाली, सुंका प्रदीप, सामला जनार्दन, संदीप यादव आणि गुंडू श्रीकुमार यांच्यासह अन्य स्वयंसेवकांनी सेवा उपक्रमात सक्रिय सहभाग घेत वारकऱ्यांना आवश्यक मदत व सहकार्य केले.

आषाढी एकादशीची वारी ही केवळ एक आध्यात्मिक यात्रा नसून भक्ती, समता, शिस्त आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. लाखो भाविक ऊन-पावसाची पर्वा न करता विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने पावले टाकत असताना, त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कपिल पाटील फाऊंडेशनसारख्या सेवाभावी संस्था, डॉक्टर आणि स्वयंसेवकांकडून दिले जाणारे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

Scroll to Top