भिवंडीत मतदार याद्या पुनर्विलोकन कार्यक्रमा अंतर्गत आढावा बैठक संपन्न

सध्या महाराष्ट्रात मतदारयाद्या पुनर्विलोकन कार्यक्रम सुरू असून त्यासाठी बी एल ओ च्या माध्यमातून प्रत्येक मतदारांच्या नावाची शोध मोहीम राबविली जात आहे. यामध्ये अनेक ठिकाणी काम अजून ही समाधानकारक झाले नसल्याने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गुरुवारी भिवंडी महापालिका येथील सभागृहात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण व शहापूर या चार विधानसभा मतदार संघातील निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्य क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. तर त्यानंतर उशिरा राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एसआयआर या मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी जनजागृती करून अधिकाधिक मतदारांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर या उपक्रमात येणाऱ्या अडचणी व समस्या यांच्या तक्रारी केल्या. या बैठकीस पालिका आयुक्त अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी अमित सानप, यांसह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. तर राजकीय पक्षांच्या बैठकीस भाजपा शहराध्यक्ष रवी सावंत, भाजपा गटनेता संतोष शेट्टी, शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, मनोज गगे, प्रभाग समिती सभापती अँड. वैभव भोईर, भाजपा ग्रामीण जिल्हा पदाधिकारी पी के म्हात्रे, मनसे शहर प्रमुख मनोज गुळवी यांसह श्याम अग्रवाल, प्रदीप बोडके, गजेंद्र गुळवी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी यावेळी बीएलओ यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेतला. सध्या बीएलओ यांच्याकडून मतदार यादीत नाव असलेल्यांना अर्ज वाटप केले जात आहेत. बीएलओ यांनी मतदारांच्या घरापर्यंत जाणे ते अर्ज वितरण करून ते भरून घेणे हे काम सुरू आहे.

Scroll to Top