रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीमध्ये जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या जलतरणपटूंनी गेल्या सहा महिन्यांत विविध जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या उत्कृष्ट कौशल्याचा ठसा उमटवला आहे. जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर या जलतरणपटूंनी अल्पावधीतच उल्लेखनीय प्राविण्य मिळवले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सेक्रेटरी मनोज पिल्लई यांनी सर्व यशस्वी जलतरणपटूंचा विशेष सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले. रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमी, डोंबिवली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या ठाण्यातील विद्यार्थ्यांना सरावासाठी दररोज ठाणे डोंबिवली असा प्रवास करावा लागत होता. ही अडचण ओळखून मनोज पिल्लई यांनी ठाण्यातील स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव सरावासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे खेळाडूंचा प्रवासाचा वेळ वाचला, सरावासाठी अधिक वेळ मिळाला आणि त्यांच्या जलतरण कौशल्यात लक्षणीय सुधारणा झाली.
मनोज पिल्लई यांच्या संवेदनशील व खेळाडूप्रेमी भूमिकेमुळे अनेक उदयोन्मुख जलतरणपटूंना अधिक दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली. त्यांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल अकॅडमीचे प्रशिक्षक, सर्व जलतरणपटू आणि पालकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


