सोनम वांगचुंक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिवंडीत तरुणाई रस्त्यावर

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या करीता दिल्ली येथे पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचूंग यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर या आंदोलनाचे लोन संपूर्ण भारतभर पसरले. दरम्यान सोनम वांगचुंक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करून व सोमवारी संसद भवनावर निघालेला मोर्चा चिरडून टाकण्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने केली जात असताना, भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भर पावसात युवक युवती यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षांच्या पाठिंब्याशिवाय युवक युवती फक्त शिक्षण यंत्रणेतील भोंगळपणा विरोधात आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी उपस्थित झाले आहेत अशी प्रतिक्रिया आर्यन गोसावी या युवकांने दिली आहे. यावेळी आंदोलकांनी हातात फलक घेऊन सोनम वांगचुंक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केंद्र सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.

यासोबतच आर पी आय सेक्युलर पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर जोरदार निदर्शन करीत धरणे आंदोलन केले. तर भिवंडी न्यायालयातील काही युवा वकिलांनी अँड. अमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना निवेदन देत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. सायंकाळी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पंकज गायकवाड यांनी काप आळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

Scroll to Top