ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडलेल्या मिंडा कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत केला आहे. कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२८ जून २०२६ रोजी कल्याण – मुरबाड अहिल्यानगर मार्गावरील मामनोली गावाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांची सहा विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली. तपासादरम्यान मृताची ओळख किशोरचंद्र साहू (४२) अशी पटली. ते मुरबाड येथील मिंडा कंपनीत कार्यरत होते. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तसेच कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला असता, या हत्येमागे कंपनीतीलच दोन कनिष्ठ कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी सौरभ गोल्हे (२४) आणि ज्ञानेश्वर कांठे (२८) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार, वैयक्तिक वादातून त्यांनी किशोरचंद्र साहू यांना जंगलात नेऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेह जंगलात टाकला. तसेच मृताच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्याही लुटल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


